मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (14:36 IST)

भाजपाला महाविकास आघाडाचे सरकार हवे आहे

भाजपासोबत निवडणूक लढवून भाजपाला बाजूला सारुन ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे. पण सध्या त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचे लक्षण दिसत असल्यामुळे सरकारी घटक पक्ष विचलित झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना फोन करुन राज्यपालांनी सदस्यत्व द्यावे अशी विनंती केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उद्धव ठाकरे हे अशा पक्षाचे प्रमुख आहेत जे भारत सरकारला पाकीस्तानसोबत लढायला प्रवृत्त करतात, पण महाराष्ट्र कोरोना योद्धे बनून फिरणार्‍या पोलिसांवर हल्ले होतात, तिथे मात्र त्यांना फारसे काही करता येत नाही. आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही, गुजरातवरुन मुख्यमंत्री ठरत नसतो वगैरे वगैरे वल्गना ते करतात. पण खरे पाहता परिस्थिती अगदी उलट आहे. ज्या नरेंद्र मोदींना अफलखान म्हटले, ज्या सामनातून मोदिंचा "बाप" काढण्यात आला, ज्याचे संपादक उद्धवजी होते तरी त्यांनी त्या वक्तव्याची जबाबदरी झटकली होती, ज्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींची अंत्ययात्रा काढली त्याच मोदींच्या पक्षासोबत ते पाच वर्षे सत्तेत होते आणि त्याच मोदींना स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी विनंती करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. हे राजकारण जे घडलं आहे ते अगदी ताजं आहे, १५ - २० वर्षात परिस्थिती बदलली असे झालेलल नाही. आपल्या बोलण्याणामुळे तसेच कृतीमुळे त्यांनीच ही नामुष्किची वेळ स्वतःवर आणून ठेवली आहे. अजूनही त्यांच्या नेत्यांचे बडबडगीत बंद झालेले नाहीत. संजय राऊत हे भुवया उडवत बोलण्यात पटाईत आहेत. हे सरकार स्थापन होण्यामागे त्यांनी पुढाकार घेतला होता म्हणून सध्या ते चाणक्याच्या आविर्भावात फिरत आहेत. हल्लीच योगी आदित्यनाथ ह्यांनी त्यांचा खोटेपणा ट्विटवरुन उघडा पाडला आहे. असो.

महाविकास आघाडीचे नेते सध्या राज्यपालांना आपला निशाणा बनवत आहेत. त्यात भाज्यपाल हा नवा शब्द उदयाला घातला आहे. राज्यपाल हे भाजपचे आहेत म्हणून ते उद्धव ठाकरेंना सदस्यत्व देणार नाहीत असा दीन प्रचार सरकारच्या समर्थकांनी करायला सुरुवात केलेली आहे. हे वादापुरते सत्य मानायचे ठरवले तर राज्यपालांना हाताशी घेऊन हवी ती खेळी खेळावी ही परंपरा कॉंग्रेस पक्षाने निर्माण केलेली आहे. २०१४ पर्यंत ही खेळी कॉंग्रेस खेळत होती. तेव्हा मात्र कुणाला लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचे वाटले नाही. आज राजकारण हे गजकरण आहे असं कुणाला जर वाटत असेल तर या गजकरणाचे सर्वेसर्वा कॉंग्रेस आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही. आपण या विषयाची फार चर्चा इथे नको करुया. मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. माझं म्हणणं असं आहे की राज्यपलांचे काय अधिकार आहेत आणि ते उद्धवजींच्या सदस्यत्वाचे काय करणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुळात महाराष्ट्र भाजपला ठाकरे सरकार हवे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की भाजपा विरोधी पक्ष आहे मग त्यांना सरकार पाडण्यात रस असलाच पाहिजे... भाजपच्या समर्थकांनी तर देवेंद्र फडणविसांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी भाजपाला दूषणे द्यायला सुरुवात केली आहे. पण दोन्हीकडच्या समर्थकांनी शांत बसण्याची गरज आहे. कारण ठाकरे सरकार महाराष्ट्र भाजपालाच हवे आहे. तसे संकेत देवेंद्र फडणविसांनी दिलेले आहे. आम्हाला मागच्या दाराने सरकार स्थापन करायचे नाही अशाप्रकारचे विधान फडणविसांनी केलेले आहे.

उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले... आपण अशा लोकांच्या जीवावर मुख्यमंत्री झालो आहोत जे सरकार पाडण्यात माहीर आहेत हे त्यांनी व त्यांच्या चाणक्यांनी ओळखून उद्धवजींच्या आमदारकीचा प्रश्न आधीच निकालात लावायला हवा होता. शिवसेनेचे इतके आमदार आहेत, एकाने तरी जागा रिकामी करुन तिथून ठाकरेंना निवडून देता आले असते. पण सरकार आल्यावर मात्र या सगळ्या शहाणपणाचा त्यांना विसर पडला होता. सगळे आपल्याच मस्तीत होते, भाजपाला आम्ही कसे धोबीपछाड केले या गुंगीत सगळे होते आणि कोरोनाचे भयंकर संकट आले. यात घटनात्मक पेच निर्माण झाला. त्यात महाराष्ट्र सरकारला कोरोनाची परिस्थिती मुळीच हाताळता आली नाही. पाहता पाहता देशात कोरोना संक्रमणात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य झाले. आता ही राजकारण करण्याची वेळ नाही असं म्हणत त्यांनी राज्यपालांच्या अधिकारांवर व त्यांच्या नैतिकतेवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे. सदस्यत्व मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे. आता तर थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करुन या सरकारने नवीन नामुष्की स्वतःवर ओढवून घेतली आहे. २४ एप्रिलला विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांसाठीची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. कोरोनाचे संकट आलेले असताना निवडणूका घेता येणार नाही. पण सरकार निवडणूक घ्यायला सांगत आहे. याचा अर्थ सरकारला सोशल डिस्टंसिंग आणि लोकांच्या सुरक्षेपेक्षा उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद महत्वाचे आहे असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्यापासून सुरु झालेले सरकार कोरोनाच्या लढाईत व कोरोना योद्ध्यांना संरक्षण देण्यात नापास तर झालेच आहे पण सरकार वाचवण्यासाठी आपण कोनत्या थराला जात आहोत याचेही भान त्यांना राहिले नसून स्वतःला लोकांच्या नजरेतून पूर्णपणे उतरवण्यासाठी प्रकर्षाने पयत्न करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांवर सरकार पाडण्याचे आरोप होत असले तरी त्यांना मात्र हे सरकार टिकावे असेच वाटत आहे. कारण सरकार पाडून सत्तेवर येण्याचा हा योग्य काळ नव्हे. मुळात भाजपाभोवती सरकार पाडण्याचे उगाच एक वलय निर्माण झाले आहे. खास करुन अमित शहा हे सरकार पाडू शकतात असं एक वलय आहे. सरकार पाडणे म्हणजे पत्त्याचा बंगला पाडण्याइतके सोपे वाटते काय? बिहार, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये जे सरकार पडले त्या सर्व राज्यांची परिस्थिती वेगवेगळी होती. पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. ज्यावेळी अजित दादांनी देवेंद्र फडणविसांसोबत शपथ घेतली होती तेव्हा मला स्वतःला वाटलं होतं की अमित शहा काही करु शकतात. पण तो गैरसमज लवकरच दूर झाला. माझे अंदाज चुकले हे मी लगेच मान्यही केले होते. असो.
 
सरकार पाडणं इतकं सोपं कधीच नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे सरकार पाडून करायचं काय? हा मुख्य प्रश्न आहे. समजा भाजपाने ठाकरे सरकार पाडलं तर भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी कोणते गणित आहे? आपली भारतीय परंपरा विश्लेषणाची नसून संश्लेषणाची आहे. आपण एखाद्या गोष्टीचं खंडण केलं तर नंतर लगेच मंडणही करतो. म्हणजे एक गोष्ट तुम्ही नाकारली तर त्यासमोर दुसरी गोष्ट सिद्ध करावी लागते. तसेच सरकार पाडले तर दुसरे सरकार सिद्ध करायला नको का? याचा विचार आधीच करावा लागतो. दुसरे सरकार तयार नसेल तर सरकार कुणीही पाडत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसेच अशा महामारीच्या संकटात आपल्याला जर विरोधी बकावर बवावे असेल तर हे दैव आपल्या बाजूने आहे असेच भाजपाचे नेते मानत असतील. समजा विरोधकांच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थितीत जर भाजपाला सत्ता स्थापनेचे वेध लागले असेल तर त्यांच्यासारखे मूर्ख तेच. पण भाजपाचे नेते चूका करु शकतील, मुर्खपणा मुळीच करणार नाहीत. अशा परिस्थिती भाजप सत्तेवर आली तर सध्या महाराष्ट्राची जी दशा झाली आहे तिचे खापर भाजपवर पडेल आणि चांगला राजकारणी आजच्या केवळ भाकरीचा विचार करत नाही तर तो येणार्‍या कित्येक पिढ्यांच्या भाकरीचा विचार करतो. उद्याच्या भाकरीचा विचार केला तर आज काटकसर करणे गरजेची आहे. भाजपा सध्या तेच करत आहे असं समजा. त्यामुळे राज्यपाल हे भाज्यपाल आहेत, भाजपाला सरकार पाडायचे आहे असला थिल्लरपणा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांनी बंद केला पाहिजे. भाजपाला ठाकरे सरकार हवे आहे. उलट सरकार पडणार नाही याची काळजी महाराष्ट्र भाजपचे नेते घेतील आणि आपली इच्छा केंद्रातल्या नेत्यांना कळवतील. कारण हे सरकार पुरते दुर्दैवी आहे व कर्तृत्वशून्य सुद्धा. सरकारच्या पडायच्या आधी त्यांना जनतेच्या नजरेतून पूर्णपणे पडायचे आहे. त्याची सुरुवात झालेली आहे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री