शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:58 IST)

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे

NCP
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक ईडी कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा न घेण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. परंतु आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने मलिकांच्या अनुपस्थितीत मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी पालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री प्रमुख नेत्यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक बोलावली होती. 
 
नवाब मलिक यांच्या खात्याची तात्पुरती जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली जाणार आहे. कोणत्या नेत्याकडे याची जबाबदारी दिली जाणार आहे त्या नेत्यांची नावं मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर जाहीर करु अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तथापि, मलिक ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्री होते, त्याची जबाबदारी धनंजय मुंडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपवली जाणार आहे. परभणीचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाचं पालकमंत्री पद प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आलं आहे.