"कोणीतरी केतकी..." म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा केतकी चितळे सोबतचा फोटो व्हायरल केतकी चितळे प्रकरणात नवा ट्विस्ट
अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी केतकीला चांगलंच सुनावलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे म्हणत राज ठाकरेंनी ही भाषा योग्य नसल्याचं म्हटलं. मात्र आता या प्रकरणात एक ट्विस्ट आला आहे.
केतकी चितळेची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंनी आज सकाळी एक पत्र लिहून या घटनेचा निषेध केला. "कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो." असं पत्र राज ठाकरेंनी समाज माध्यमांवर प्रसारित करुन त्या मजकुराला आपला विरोध दर्शवला. मात्र आता कोणीतरी केतकी चितळे असं म्हणणाऱ्या राज ठाकरे आणि केतकी चितळे यांचा सोबतचा फोटो व्हायरल होतोय. केतकी यामध्ये राज ठाकरेंना राखी बांधताना दिसली आहे.
राज ठाकरे आणि केतकी चितळे यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होते आहेत. राज ठाकरे केतकी चितळेला ओळखतात का? ओळखत असतील तर त्यांनी पत्रात "कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्ती" असा उल्लेख का केला असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन निमित्त अनेकजण येतात, त्यांना राखी बांधतात असं स्पष्टीकरण या फोटोवर येऊ शकतं.
दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाई होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसंच पुण्यातही तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. केतकिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा तिच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला.