गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (08:15 IST)

पतसंस्थांमधील ठेवींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

ajit pawar
सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे. आरबीआयचे यापूर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
 
कोल्हापूर रोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या. सांगली यांच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते.
 
सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आव्हाने आहेत. संपूर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुद्धा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकाराच्या सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सहकारी संस्था योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कारभारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यावसायिकता यावी व आधुनिकीकरणाचा अवलंब करावा, यामध्ये डिजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले
 
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल, असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एखाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तू अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास 51 शाखा कार्यरत आहेत. आता आणखी 10 शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर अण्णांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचा आहे.सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खूप मोठी आव्हाने आहेत या सर्व आव्हानांवर मात करुन कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. 1987 साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला मदत करत खऱ्या अर्थाने या संस्थेने त्यांना सक्षम केले आहे. ही पतसंस्था सांगलीच्या वैभवात भर घालेल.