रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (15:11 IST)

ड्रग्ज प्रकरणातील 'मास्टरमाईंड' राष्ट्रवादीचा?

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
 
मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाची वेगळी बाजू मांडून एकच खळबळ उडवून दिली. माझ्या माणसाची एनसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या असं पाटीलने सॅम डिसूजाला सांगितलं होतं. पाटील यांचा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून किरण गोसावी होता. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं, असा गौप्यस्फोट कंबोज यांनी केला.
 
सुनील पाटीलच मास्टरमाइंड
आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही त्यांनी सांगितलं.