मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑगस्ट 2021 (17:25 IST)

गणेशोत्सवासाठी कोकणात “मोदी एक्सप्रेस” धावणार

या वर्षी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून खास ट्रेन सोडण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी “मोदी एक्सप्रेस” दादर स्टेशनवरुन धावणार असल्याची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. या ट्रेनने विनामुल्य प्रवास करता येणार असून प्रवाशांना एकवेळचे जेवणही देण्यात येणार असल्याचे भाजप नेते नितेश राणे यांनी सांगितले आहे. एकूण १८०० नागरिक या ट्रेनचा लाभ घेऊ शकणार आहेत.
 
भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार माणण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्सप्रेस सोडत आहोत. यामध्ये १८०० नागरिकांची सोय करण्यात येणार आहे.
 
कोकणात जाणारी मोदी एक्सप्रेस दादर येथून सोडण्यात येणार असून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. दादरमध्ये प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे.
 
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचे बुकिंग २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत फोनद्वारे करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री व संतोष कानडे यांना फोन करुन जागा आरक्षित करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.