जळगावला डी मार्टला नागरिकांची जबरदस्त गर्दी , कोरोनाला आमंत्रण, गर्दी पाहून स्टोअर केल बंद
स्वातंत्र्य दिनी असलेल्या सुट्टीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडू पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. डी मार्टमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने व्यवस्थापनाला स्टोर बंदचा बोर्ड लावला लागला. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनालाच आमंत्रण दिले जात होते.
रविवार आणि स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या सुट्टीच्या दिवसाचे निमित्त साधत नागरिकांनी सकाळपासूनच डी मार्टमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. मॉलच्या तळघरातील पार्किंगची जागा पूर्ण भरल्यानंतर नागरिकांची रांग बाहेरील खुल्या पार्किंगमध्ये देखील पोहचली होती. नागरिकांची गर्दी वाढतच असल्याने मॉल प्रशासनाकडून स्टोर बंदचे फलक लावत मुख्य गेट बंद केले. अनेक ग्राहक बाहेर गावाहून आलेले असल्याने त्यांना परत जावे लागत असल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
दरम्यान, नागरिकांनी मॉलच्या बाहेर रस्त्यावर वाहने लावल्याने अर्धा रस्ता व्यापला गेला होता. इतर वाहनधारकांना आणि रिक्षा चालकांना आपल्या रिक्षा बाहेर काढण्यास जागा नसल्याने रहदारी ठप्प होत होती. गर्दीत कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे.