पानशेत धरणात दांपत्याची मुलासह बुडाली कार, महिलेचा मुत्यू
रस्त्यावरून जात असताना अचानक कारचा टायर फुटला आणि गाडी थेट पानशेत धरणाच्या पाण्यात गेली. या भीषण अपघातात कारमधील महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे तर या अपघातात पती आणि मुलगा यांचे प्राण वाचले आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ही माहिती दिली.
ही दुर्घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली. या कारमध्ये तिघे जणच प्रवास करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात बुडून मेलेल्या महिलेचे नाव समृद्धी योगेश देशपांडे वय 33 असे आहे. तर त्यांचे पती योगेश देशपांडे वय 35 व मुलगा हे या अपघातातून बचावले आहेत. हे कुटुंब पुण्यातील शनिवार पेठ परिसरात राहत होते.
प्राथमिक माहितीनुसार, देशपांडे कुटुंब पुण्याहून पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. कुरण या गावाच्या पुढे आल्यावर त्यांनी आपली कार जेवणासाठी हॉटेलवर थांबवली. यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पावसाचा जोर अधिक असल्याने त्यांनी कारमध्येच बसण्याचे पसंत केले. त्यांनी या कारमध्ये नाश्ता सुद्धा केला. नाश्ता करून हे कुटुंब दुपारी दोन वाजता काजवे गावाच्या दिशेने निघाले. महिलेचे पती कार चालवत होते व मुलगा शेजारी बसला होता. मागील सीटवर पत्नी बसली होती. धरणाच्या काठाने कार चाललेली असताना अचानक टायर फुटला आणि कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, कार रस्ता सोडत सरळ पाण्याच्या दिशेने गेली. ही कार पाण्याच्या दिशेने जात असताना कार चालकाने कार आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न निष्फळ राहिले आणि कार सरळ पाण्यात गेली. ही कार सुरुवातीला पाण्यावर तरंगत होती. पण नंतर कार मध्ये हळू हळू पाणी शिरू लागले. त्यामुळे पुढच्या बाजूच्या दोन्ही खिडक्या उघड्या असल्याने महिलेचे पती आणि मुलगा पाण्याबाहेर पडण्यास यशस्वी झाले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्यामुळे समृद्धी यांना बाहेर पडताच आले नाही.
मोठा आवाज झाल्याने शेजारील हॉटेलमधील लोक धावत घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील दोरी घेऊन वैभव जागडे याने पाण्यात उडी मारली आणि गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि दुसर्याबाजूला झाडाला बांधली. यामुळे कारने तळ गाठला नाही आणि पुढच्या खिडकीतून समृद्धी यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. वैभवने कारच्या जॅकनं मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने पानशेत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.