मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (07:50 IST)

भूमाफियांना मोक्का, पोलिस महासंचालकांचीही परवानगी

नाशिकमधील  आनंदवली येथील रमेश मंडलिक खू’न प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेले बाळासाहेब बारकू कोल्हे यांची या कारवाईला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या भूमाफिया टोळीवरील मोक्का कारवाईवर अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी देखील शिक्कामोर्तब केल्याने भूमाफियांना दुहेरी दणका बसला आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भूमाफियांच्या विरोधात पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी धडक कारवाई करत राज्यात भूमाफियावर पहिलाच मोक्का लावला होता. या विरोधात बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गुन्ह्याचे तपासाचे कागदपत्राचे तसेच तपासी अधिकारी सहायक आयुक्त समीर शेख यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन करत मंडलिक खू’न प्रकरणात संघटित गुन्हेगारी टोळीकडून वृद्ध रमेश मंडलिक यांचा कट रचून खू’न केला होता. या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे हा ‘किंगपिन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची बाब लक्षात घेत ही याचिका फेटाळली.
 
या पाठोपाठ पोलिस आयुक्तांनी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे मोक्का आदेशातील भूमाफिया विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मिळण्यासाठी पाठवलेल्या अहवालास मंजुरी दिली. यामुळे या भूमाफियावर मोक्का कारवाईवर शिक्कामोर्तब झाला आहे.
 
नाशिक पोलिसांनी याप्रकरणातील संशयितांवर मोक्का कारवाईचा निर्णय घेतला. मात्र त्यास उच्च न्यायालयात याचिका करत आव्हान देण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे यांची ही याचिका काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या कारवाईचा मार्ग मोकळा झाला होता. आता त्यावर पोलिस महासंचालकांची मान्यता मिळशली आहे.
 
अशी आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी:
गुन्ह्याचा मास्टरमाईंड रम्मी राजपूतसह सचिन मंडलिक यांनी कट रचत अक्षय मंडलिक, भूषण मोटकरी,सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, मुक्ता मोटकरी, अशांनी गुन्ह्याचा कट रचून रमेश मंडलिक यांचा खू’न केला होता. तपासादरम्यान हा गुन्हा संघटित टोळीने केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी टोळीच्या सदस्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त समीर शेख करत आहे.
 
भूमाफियांचे समूळ उच्चाटन करणार:
भूमाफियांकडून गरिबांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार घडत आहे. या कारवाईने भूमाफियांवर पोलिसांची जरब निर्माण झाली आहे. शहरात अशाप्रकारे कुठेही गरीब शेतकरी, प्लॉट मालकांची जमीन बळकवण्यात आल्यास अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी पोलिस सदैव आहेत. भूमाफियांना न घाबरता याबाबत पोलिसांत तक्रार करा. – दीपक पांडेय, पोलिस आयुक्त मोक्का तरतुदीनुसार कारवाई करता येणार.
 
भूमाफिया टोळीतील रम्मी राजपूत, बाळासाहेब कोल्हे किंगपिन आहे. लॅन्ड ग्रॅबिगसाठी हिंसाचार धाकदडपशा व जबरदस्ती करून निष्पाप भूधारकांच्या जमिनी बळकावण्यासाठी टोळीसाठी आर्थिक पुरवठा करणारा सदस्य आहे. मोक्का कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कारवाई करता येईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्ता बाळासाहेब कोल्हे याची याचिका फेटाळली. अपर पोलिस महासंचालकांनी देखील मोक्का कारवाईवर शिक्कामोर्तब केल्याने भूमाफियांना दुहेरी दणका दिला.