1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (09:16 IST)

नो हेल्मेट नो पेट्रोल; ७२ चालकांच लायसन्स रद्द ?

No helmet no petrol; Only 72 drivers' licenses revoked?
नाशिकमध्ये १५ ऑगस्ट या दिवसापासून नो हेल्मेट नो पेट्रोल या उपक्रमाला सुरवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या उपक्रमास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंपावर हेल्मेटची अदला-बदल करत पेट्रोल घेत असल्याचे निदर्शनास आले.
 
पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट पेट्रोल घेण्यासाठी अर्ज भरून देणाऱ्या ७२ दुचाकी चालकांनी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांंच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत घरी जाऊन नोटीस बाजावली आहे. या चालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच या चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत न्यायालयात दंडात्मक कारवाई होणार असल्याचं समजतंय.
 
काही पंपचालक विनाहेल्मेट पेट्रोल विक्री करत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना प्राप्त झाल्याची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी चालकांवर कोरोना साथरोग कायद्यांतर्गत आणि पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. या नंतर पंपचालकांना विनाहेल्मेट पेट्रोल घेणाऱ्या चालकांकडून अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
 
अनेक चालकांनी खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. न्यायालयाकडून मोटार वाहन नियम कायद्यांतर्गत समन्स बजावत दंडात्मक कारवाई हाेणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा. – दीपक पांडये, पोलिस आयुक्त