मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (08:01 IST)

नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडण्यास ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोध

नाशिक :- नाशिक विभागातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत 30 ऑक्टोबरनंतर विचार करणे योग्य असताना जिल्हा प्रशासन आतापासूनच पाणी सोडण्याची तयारी करीत आहे. या कृतीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्टपणे विरोध केला आहे.
 
राज्यात समन्यायी पाणीवाटपाबाबत मेंढेगिरी समितीचा अहवाल हा राज्य सरकारने स्वीकारला नाही, त्यामुळे त्यावर नाशिक जिल्हा प्रशासनाने आताच कारवाई करणे हे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले, की भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला पाणी मिळावे म्हणून पश्चिम विभागातील पाणी वळविण्याचा जो प्रस्ताव मंजूर केला आहे, त्यावर आता प्रत्यक्षात कारवाई केली जाणार आहे.Jayakwadi
 
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा हा कमी असल्यामुळे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याची जी मागणी होत आहे. त्यावर दि. 30 ऑक्टोबरनंतर विचार करून निर्णय घेतला जाईल; परंतु नाशिक जिल्हा प्रशासनआताच मेंढेगिरी आयोगाच्या प्रमाणे पाणी वाटप करण्याचा आणि पाणी सोडण्यासंदर्भातला विचार करीत आहे, तो अयोग्य आहे.
 
कारण राज्य सरकारने या आयोगाच्या शिफारशी स्वीकारलेल्या नाहीत. या आयोगाच्या शिफारशीवरून मी स्वतः न्यायालयात गेलो आहे. न्यायालयात अजूनही ही केस सुरू आहे. जर राज्य सरकारने मेंढेगिरी आयोगाच्या शिफारशी स्वीकारलेल्या नसताना नाशिक जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही का करावी, असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाने घेतलेली भूमिका ही चुकीची आहे, असे स्पष्ट मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
 
ते म्हणाले, की या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातून पाणी आणण्यासाठी काही करोडो रुपयांच्या योजना मंजूर केल्या आहेत, त्यावर आता प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे.
 
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, की विरोधी पक्षाचे काम हे आरोप करण्याचे असते. त्यामुळे ते आपली भूमिका चोख बजावत आहेत. त्यांच्या भूमिकेवर आम्ही काही बोलणे योग्य होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केलेल्या हल्लाबोलबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, की आज त्यांचा पक्ष हा पूर्णपणे संपलेला आहे. त्यांना आज काही विषय राहिलेले नाहीत, म्हणून काही तरी विषय घेऊन ते नागरिकांसमोर येण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आपले स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.