सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (14:38 IST)

आता एकनाथ खडसेही जाणार गुवाहाटीला; स्वतःच दिली माहिती

eknath khadse
राज्यातील सत्तासंघर्ष, बंडखोर आमदारांची गुवाहाटी वारी आणि अन्य घडामोडी विशेष चर्चेत आहेत. त्यातच सत्ताधारी गटाचे ४० आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याचे वृत्त आहे. हे सर्व घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सुद्धा गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनीच स्वतः ही माहिती जाहीरपणे दिली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे आणि विद्यमान मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे राजकीय वैर तथा संघर्ष सर्वांनाच परिचित आहेत. दोघेही नेते एकमेकावर सतत आरोप प्रत्यारोप करीत असतात. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये घराणेशाही प्रकरणावरून वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा नाथाभाऊंनी खुद्द गिरीशभाऊ यांच्या मतदारसंघात जाऊन राज्यातील सत्तातंराच्या आधी सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन आलेल्या ४० आमदारावर टीका करीत चांगलीच टोलेबाजी केली. इतकेच नव्हे तर आपल्या उपरोधक भाषणात त्यांनी या प्रकरणी पुन्हा एकदा भाष्य करीत चांगलेच बोचकारे, चिमटे आणि ओरखडे काढले. त्यामुळे या सभेत कार्यकर्त्यांची चांगलीच करमणूक झाली. तसेच या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून आता भाजपचे हे ४० आमदार याप्रकरणी काय बोलतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस एका विभागाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना खडसे म्हणाले की, मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे, आणि परत आमचे सरकार येऊ दे, असे साकडे घालणार आहे, असे खडसेंनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, बंडखोर ४० आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे, असा टोला त्यांनी हाणला.
 
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती. नाथाभाऊ म्हणाले होते की, मुख्यमंत्री शिंदे हे प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते, तशी प्रेयसी सोबतचीही आठवण असते. ‘भेट तुझी माझी प्रेमाची, अजून त्या दिसाची, झुंज वाऱ्याची, रात्र पावसाची… ‘ तशी, आपले शिंदे साहेब परत ४० आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची.. अशी उपरोधीक टीका खडसेंनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुवाहाटीचा उल्लेख आल्याने भाजप नेते आणि आमदार याबाबत काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात खोके, गुवाहाटी, गद्दार, बंडखोर, खरे वारसदार वगैरे शब्द वारंवार येत असल्याने नागरिकांचे देखील हे शब्द ऐकून कान किटले आहेत, असे म्हटले जाते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor