शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (10:25 IST)

राज ठाकरेंच्या आदेशानंतर राहुल गांधींच्या निषेधासाठी मनसैनिक शेगावला रवाना

maharashatra navnirman sena
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
आज (18 नोव्हेंबर) राहुल गांधी यांची एक सभा अकोला जिल्ह्यातील शेगावमध्ये नियोजित आहे. याठिकाणी जाऊन राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे.
 
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती काल प्रसारमाध्यमांना दिली. तसंच ते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शेगावच्या दिशेने रवाना झाले.
 
“आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जे करु ते लोकशाही मार्गानेच करु. पोलीस पोलिसांचं काम करतील. कायदा कायद्याचं काम करेल. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करु,” असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
 
सावरकरांनी पेन्शन घेतली याला पुरावे काय? - रणजित सावरकरांचा राहुल गांधींना सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.
 
'सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे,' असा आरोप राहुल गांधीनी केला आहे.
 
त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी तर राहुल गांधींच्या अटकेची मागणी केली आहे.
 
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधीची 'भारत जोडो' यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे.
 
हिंगोलीत झालेल्या जनजातीय गौरव दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “अंदमान जेलमध्ये असताना सावरकरांनी एक ब्रिटिशांना एक पत्र लिहून त्यांची माफी मागितली आणि तुरुंगातून सोडण्याची मागणी केली. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत असत. ते काँग्रेसच्या विरोधात काम करत असत.
 
वीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून निवृत्तीवेतन स्वीकारले होते. ते काँग्रेसविरोधात होते. तुरुंगात बाहेर आल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांनी दिलेल्या प्रस्तावाचा स्वीकार केला आणि इंग्रजांना सहकार्य केले. सावरकर आणि बिरसा मुंडा यांच्यात एक फरक होता. ते 24 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला.”
 
आदिवासींचे नेते बिरसा मुंडा ब्रिटिशांविरुद्ध लढले. मात्र हल्ली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांच्या विचारसरणीवर टीका केली जाते.
 
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप  आणि शिवसेनेने टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी याविरोधात आंदोलनं सुरू झाली आहेत.
 
नवी मुंबईत शिवसेनेने गांधीविरुद्ध आंदोलन छेडलं. नागपुरातही भाजयुमोने आंदोलन केलं आहे.  
 
सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही 'भारत छोडो' नव्हे तर 'भारत तोडो यात्रा' असल्याचं ते म्हणाले.
 
राहुल गांधी यांनी धादांत खोटी विधानं करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषांचा अवमान केला आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी आणि खटला चालवावा अशी मागणी करत आहे असा या तक्रारीत उल्लेख केला आहे.
 
सांगलीतही मनसेने या विरोधात आंदोलन केलं आहे.
 
“महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींच्याकडून सावरकरांचा अपमान हा कदापी सहन केला जाणार नाही आणि राहुल गांधींनी सावरकरांच्या बद्दल केलेल्या विधान बाबत तातडीने जाहीर माफी मागावी अन्यथा उद्या त्यांची 'भारत जोडो' यात्रेनिमित्त बुलढाणा येथील शेगाव या ठिकाणी होणारी सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उधळून लावेल,”असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही 'भारत जोडो' नाहीतर 'भारत छोडो' यात्रा आहे,असं वक्तव्य केलं आहे. हिंदू विचारवंताचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला. आजही काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचा प्रयत्न केला जातो. राहुल गांधींसारखे नेते त्यांच्याविषयी खोटं बोलतात. निर्लज्जपणे काहीही सांगतात. त्यांना महाराष्ट्रातील जनता नक्की उत्तर देईल. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावातील 'स' तरी माहिती आहे का?” असं ते म्हणाले.
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे.
 
“राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव प्रेम, निष्ठा, आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या. तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आता गरज आहे” असं ते म्हणाले.
 
‘सावरकरांनी पेंशन घेतली म्हणता याला पुरावे काय?’
सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
राहुल गांधींच्या अटकेची मागणासुद्धा त्यांनी केली आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. सावरकरांनी माफी मागितली असं ब्रिटिश पण कधी म्हणाले नाहीत. ब्रिटिश सावरकरांना कायम धोकादायक शत्रू मानत आले आहेत, असे ब्रिटिश गुप्तचर खात्याचे रेकॉर्ड्स आहेत."
 
"सही करताना आपण मराठीत जसं म्हणतो तुमचा आज्ञाधारक, तुमचा नम्र तशी त्या काळात युअर मोस्ट ओबीडीयंट सर्वंट अशी लिहायची पद्धत होती. हे १९२० चं पत्र दाखवतात माझ्याकडे महात्मा गांधी ह्यांचं त्याच काळातलं पत्र आहे. यात त्यांनीही मोस्ट ओबीडीयंट सर्वंट असं म्हटलेलं आहे," असा दावा रणजित सावरकर यांनी केला आहे.
 
“सावरकरांनी या देशासाठी क्रांतीकारक म्हणून उडी मारली त्यावेळी मालमत्ता नष्ट झाली. ते जहागीरदार होते. ते बॅरिस्टर होते. त्यांनी लाखो रुपये कमवले असते, पण असं न करता त्यांनी पूर्ण वेळ दिला. तारुण्य तुरुंगात घालवलं. अशा व्यक्तीला पेंशन घेतली म्हणता. याचे काय पुरावे आहेत. ज्या माणसाने 14 वर्षं तुरुंगवास, 13 वर्षं स्थानबद्धता सहन केली,” असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे.  
 
बीबीसीशी बोलताना रणजित सावकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा टीका केली आहे.  
 
“उद्धव ठाकरे म्हणतात मी सहमत नाही याला काही अर्थ नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला म्हणून मुंबईत येऊ दिलं नव्हतं. तुम्ही सांगू शकत नाही की त्यांचा अपमान करू नका. एवढं बोलायचीही हिंमत ते दाखवू शकले नाहीत,” असं ते म्हणाले.  

राहुल गांधी वक्तव्यावर ठाम
दरम्यान राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला असून महाराष्ट्र सरकारला 'भारत जोडो' यात्रा थांबवण्याचं आव्हान दिलं आहे.
 
सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. ते घाबरत होते, म्हणूनच त्यांनी माफीनाम्यावर सही केली, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो' यात्रा आज (17 नोव्हेंबर) अकोला येथे आहे. यादरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
 
ते म्हणाले, "सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र पूर्ण नक्की वाचा. त्यातील शेवटची ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुमचा नोकर बनून राहण्याची माझी इच्छा आहे,' असं सावरकरांनी यात म्हटलेलं आहे. हे पत्र सावरकरांनीच लिहिलं आहे. हे पत्र देवेंद्र फडणवीसांना पाहायचं असेल तर ते पाहू शकतात. सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली होती."
 
तसंच, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला सहमती दर्शवली नव्हती, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला गांधी यांनी कोणतंच उत्तर दिलं नाही, हे विशेष.
 
ते पुढे म्हणाले, "सावरकरांनी हे पत्र लिहिलं आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे वर्षानुवर्षे तुरुंगात होते. पण त्यांनी कोणतंही पत्र लिहिलं नाही. पण सावरकर यांनी हे पत्र लिहिलं, त्याचं कारण काय असेल, याचा विचार मी करत असतो. हे पत्र लिहिण्याचं खरं कारण ही भीती होती. जेव्हा त्यांनी या पत्राखाली सही केली, तेव्हा त्यांनी इतर सगळ्या नेत्यांना धोका दिला."
 
सावरकरांनी माफीनाम्यात काय म्हटलं होतं?
अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी इंग्रज सरकारला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात ते म्हणतात, “सरकारने जर कृपा करून आणि दया दाखवून माझी सुटका केली तर मी घटनात्मक प्रगती आणि ब्रिटीश सरकार प्रति निष्ठा ठेवून कट्टर समर्थक राहीन, जी त्या प्रगतीसाठीची पहिली अट आहे."
 
"मी सरकारची कोणत्याही पद्धतीनं सेवा करायला तयार आहे. जसं माझी आताची भूमिका प्रामाणिक आहे, तसंच माझं भविष्यातलं आचरण असेल.”
 
"मला तुरुंगात ठेवून काही मिळणार नाही, पण सुटका केली तर काहीतरी प्राप्त नक्कीच होईल. केवळ पराक्रमी व्यक्तीच दयाळू असू शकते आणि त्यासाठी 'विलक्षण पुत्र' आई-वडीलांच्या दरवाजाशिवाय दुसरीकडे कुठे जाणार?"
 
"माझ्या आयुष्याच्या सुरूवातीला ज्या प्रगतीच्या शक्यता होत्या त्या धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे मला इतके क्लेश होत आहेत की, सुटका हा माझ्यासाठी जणू नवा जन्मच असेल. तुमचा दयाळूपणा माझ्या संवेदनशील आणि विनम्र मनाला स्पर्शून जाईल. भविष्यात राजकीयदृष्ट्या उपयुक्त ठरू शकतो. जिथे शक्ती अपयशी होते, तिथे उदारता कामी येते."
 
"मी आणि माझा भाऊ एका ठराविक कालावधीसाठी राजकारणात सहभागी न होण्याची शपथ घेण्यासाठी तयार आहोत. अशाप्रकारच्या प्रतिज्ञेखेरीज माझ्या खराब प्रकृतीच्या कारणामुळेही मी येणाऱ्या वर्षांमध्ये शांत आणि सेवानिवृत्त आयुष्य जगण्यासाठी इच्छुक आहे. आता कोणतीही गोष्ट मला सक्रीय राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकत नाही."
 
Published By- Priya Dixit