मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (07:52 IST)

आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न : कार्याध्यक्षपदाला घटनेत स्थान नाही

Now the question of who is the Nationalist
Now the question of who is the Nationalist मुंबई : शिवसेना कुणाची या प्रश्नाच्या उत्तरात वर्षभर कायदेशीर काथ्याकूट सुरू होता. कोर्टात ती केस संपते ना संपते, तोच आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. सगळ््यात महत्वाचे म्हणजे पुन्हा राष्ट्रवादीची घटना चर्चेत येणार आणि कार्याध्यक्ष नावाचे पद जरी घोषित झालेले असले तरी पक्षाच्या घटनेत मात्र अद्याप त्यांची नोंद झालेली नाही. राष्ट्रवादीत २ कार्याध्यक्षांची नियुक्ती तर झाली, पण मुळात या पदाला पक्षाच्या घटनेत अद्याप स्थान देण्यात आलेले नाही. त्याआधीच पक्षातले बंड झाल्याने हे पद कायदेशीर लढाईत बिनकामाचे ठरणार, असे दिसते.
 
१० जून रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनात मोठी घोषणा झाली. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे या दोघांनाही कार्याध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. पण ही केवळ घोषणा आहे. जोपर्यंत पक्षाच्या घटनेत बदल करून हे पद निर्माण केले जात नाही, तोपर्यंत त्या पदाला ना कुठला अर्थ ना अधिकार आहे. कारण घोषणा झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांतच पक्षात दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांचे कार्याध्यक्षपद हे या कायदेशीर लढाईत कुठल्याच गटाच्या फायद्याचे ठरणार नाही. पण प्रफुल्ल पटेल यांच्या याआधीच्या उपाध्यक्षपदाचा फायदा अजित पवार गटाला होतो का, हे पाहावे लागेल.
 
सद्यस्थितीत काका गटाकडे अध्यक्षपद तर अजित पवार गटाकडे प्रफुल्ल पटेलांच्या रुपाने उपाध्यक्षपद आहे. कालच्या पत्रकार परिषदेत पटेल यांनी ज्या नियुक्त्या रद्द केल्या, त्या उपाध्यक्षपदाच्याच अधिकारात केल्या.
 
अध्यक्षांच्या संमतीविना निर्णय घेता येत नाहीत
मुळात उपाध्यक्ष कुठलाही अधिकार अध्यक्षांच्या संमतीविना वापरू शकत नाहीत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. पक्षाचे अध्यक्ष तर शरद पवारच आहेत, असे अजितदादा, प्रफुल्ल पटेल मान्य करत आहेत. मग त्यांनीच केलेल्या नियुक्या, बरखास्तीचे अधिकार त्यांना मान्य नाहीत का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.