मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:45 IST)

एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, नेमकी काय घोषणा करणार याकडे लक्ष

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.आज संध्याकाळी ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पोहोचणार आहेत. उद्या मालेगाव आणि नाशिक येथील कार्यक्रम आटोपून संध्याकाळी ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे येणार आहेत. 31 जुलै रोजी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याशिवाय ते मराठवाड्यात पावसामुळे जे नुकसान झालं, त्याचीही विभागीय आढावा बैठक घेणार आहेत.
 
यासोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ते त्यांच्या गटातील आमदारांच्या संपर्क कार्यालयांना भेटी देणार आहेत.
 
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली होती.
 
त्यामुळे आता आपल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे त्यांना प्रत्युत्तर देणार, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी काय घोषणा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
विरोधकांची टीका
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहे. शिवसेनेपासून वेगळे झालात, तर स्वतंत्र पक्ष स्थापन करा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
"हम दो हमारे दो वाले हे सरकार आहे. एक महिना होऊनही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही हे माहिती नाही. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे, तरीही मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही."
 
माझा आवाज बंद करण्यासाठी ईडीची कारवाई सुरू आहे. तरीही मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबर राहिल. शिवसेना सोडणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार हे कालपासून (28 जुलै) विदर्भातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत.
 
आज (29 जुलै) सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
 
ते म्हणाले, "विदर्भातल्या पूरग्रस्त परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाययोजना करण्याचे सोडून आमच्या सरकारमध्ये पाचच मंत्री होते असे उत्तर देत आहेत. जरी आमच्या सरकारमध्ये सुरुवातीला पाच मंत्री होते तरी त्यातील अनेक जण मुख्यमंत्री होण्याची क्षमता ठेवणारे होते. आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुंबई सुद्धा तेच सांभाळत आहेत. महाराष्ट्र तेच सांभाळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दोनच व्यक्ती कसे सांभाळणार यावर काही बोलत नाही."
 
"विदर्भातल्या पूरग्रस्त जिल्ह्यात पंचनामे झालेले नाही. नुकसान भरपाई बाबत सध्या काही बोललं जात नाही. काही प्रश्न विचारला की तुमच्या वेळेस पाचच मंत्री होते हे उत्तर बरं नाही. आम्हाला सरकारमध्ये काम कसं करायचं आणि विरोधी पक्षात असताना काम कसं करायचं याची चांगली जाणीव आहे. त्यामुळेच मी स्वतः पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करायला आलोय," असंही अजित पवार म्हणाले आहेत.
 
सत्तारांनी जाहीर केली राजीनाम्याची तारीख
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यात बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका सातत्यानं घेतली आहे.
 
याविषयी बोलताना सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, "31 तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे, मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे. त्यांचे आभार मानणार आहे.त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिल्लोड मतदारसंघात ठेवलेला आहे. आमच्या 50 जणांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे."