शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये

विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत धमकीची भाषा केली. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्यं आहेत जी धमकी वाटू शकतात असंही संजय राऊत म्हणाले. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये असंही संजय राऊत म्हणाले.
 
“महाविकास आघाडी सरकारला वर्ष झालं आहे. लोक वर्षपुर्ती आपल्या पद्धतीने साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही आपल्या पद्धतीने आमच्या सरकारची वर्षपुर्ती साजरी केली असंच मी मानतो. सामनामधली मुलाखत देवेंद्र फडणवीस यांनी वाचली आणि पाहिली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नेमकी कुठे वापरली यावर अंडरलाइन केलं असतं तर मला त्यावर उत्तर देता आलं असतं. पण त्यांनी असं काही सांगितलंच नाही. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधकांच्या कुंडल्या हातात घेऊन बसलो आहे अशी भाषा केली होती. त्यांची अशी अनेक वक्तव्यं माझ्या स्मरणात आहेत. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागत असेल तर त्यांना उत्तर देणं मुख्यमंत्र्यांचं काम आहेच.” खोटेपणा करुन विरोधकांनी आरोप करु नये असंही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.