पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजेत सहभागी होण्याची इच्छा ठेवणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती कडून ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु करण्यात आली असून ही नोंदणी बुधवार 25 मार्च पासून सुरु होणार आहे. एप्रिल ते जुळे 2026 या कालावधीत होणाऱ्या पूजेसाठी भाविकांना आगाऊ नोंदणी करता येणार आहे.
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सदर माहिती दिली. या पूर्वी ही ऑनलाईन नोंदणीला राज्यासह परराज्यातील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे ते म्हणाले.
मंदिर समितीकडून भाविकांसाठी नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजना अशा विविध पूजांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या पूजांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.
या साठी भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन इच्छित पूजेचा प्रकार, महिना आणि तारखेची निवड करायची आहे. या दिवशी जागा उपलब्ध नसल्यास पर्यायी तारीख निवडण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.
1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत सण-उत्सव व गर्दीचे दिवस वगळता इतर दिवशीच्या पूजांसाठी नोंदणी खुली करण्यात आली आहे. विशेषतः एप्रिल महिन्यातील तुळशी अर्चन पूजेसाठीही ही सुविधा उपलब्ध असेल.
ऑनलाईन पूजेची नोंदणी करताना काहीही तांत्रिक अडचण आल्यास मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.
पूजेचे दर -
श्री विठ्ठल नित्यपूजा – ₹25,000
श्री रुक्मिणी नित्यपूजा – ₹11,000
पाद्यपूजा – ₹5,000
तुळशी अर्चन – ₹2,100
महानैवेद्य सहभाग – ₹7,000
Edited By - Priya Dixit