सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (19:01 IST)

शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, कोणते नेते उपस्थित?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी होणऱ्या राष्ट्र मंचाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे.
 
बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत.
 
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका आणि 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
विरोधी पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी उघडणार का? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधण्याच्यादृष्टीने या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
 
बैठकीत कोण-कोण उपस्थित?
भाजपतून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा,सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, माजी आयएएस अधिकारी, नितिश कुमार यांचे माजी सल्लागार आणि राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के.टी.एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित आहेत.
 
बैठकीला केवळ राजकीय नेत्यांचीच उपस्थिती नाहीये. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमध्ये भारताचे निवृत्त राजदूत के.सी.सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, कवी, चित्रकार, पत्रकार आणि 1998 शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, सीपीएमचे माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीमध्ये आहेत.
काँग्रेसकडून मात्र अद्याप या बैठकीसाठी कोणीही पोहचलेलं नाही. राष्ट्र मंचच्या बैठकीसाठी काँग्रेसकडून कायम कोणीतरी उपस्थित असते मात्र यावेळेस अद्याप कोणीही आलं नाहीय. पण काँग्रेसकडून कोणीतरीही येईल अशी शक्यता पवन वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना वर्तवली.
 
 
राष्ट्र मंच काय आहे?
यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करून मंगळवारी (22 जून) शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंचची बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे.
सिन्हा यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये 'राष्ट्र मंच'चे समन्वयक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी मंगळवारी (22 जून) जी बैठक होणार आहे, ती 'राष्ट्र मंच'च्या बॅनरखाली होणार आहे, असं यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलंय.
 
ट्विटरवर या मीटिंगबद्दल माहिती देणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, याआधी राष्ट्रमंचची बैठक व्हायची तेव्हा कोणाच्या लक्षातही यायचं नाही.
 
 
प्रशांत किशोर यांची भूमिका काय?
सोमवारी (21 जून) शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. त्यानंतर आजच्या राष्ट्र मंचच्या बैठकीचा आणि प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेण्याबाबत खलबतं सुरू झाली.
 
या दोन्ही बैठकींचा परस्परांशी संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बीबीसी मराठीला दिली. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांनी ही माहिती दिली.
 
"प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यामध्ये झालेली बैठक आणि आज होणारी राष्ट्र मंचाची बैठक या दोन्ही राजकीय घडामोडींमध्ये काही संबंध नाही. शरद पवार यांच्याकडून कुठलाही आमंत्रण गेलेले नाही राष्ट्र मंचाच्या लोकांनी आमंत्रण देऊन लोकांना बोलावलं आहे," असं पटेल यांनी स्पष्ट केलं.
 
लोकसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होईल, शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाईल, असं म्हटलं जात आहे.
 
या बैठकीपूर्वी त्यांनी आज (21 जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
11 जून रोजी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती.
 
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकांमध्येही सहकार्य केले होते. त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.