शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (19:43 IST)

"न्यायदेवतेवरचा आमचा विश्वास सार्थ ठरला – उद्धव ठाकरे

मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेनं ठाकरेंना दसरा मेळाव्यास परवानगी नाकारल्याचा आदेश कोर्टाने रद्द ठरवला आहे.
 
"न्यायदेवतेवरचा आमचा विश्वास सार्थ ठरला आहे, न्यायदेवतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयावर दिली आहे. कायदा आणि सूव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यांनीसुद्धा ती पार पाडावी, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
 
"दसरा मेळाव्याला येणाऱ्यांना विनंती करतो. सर्वांनी उत्साहाने या. पण परंपरेला गालबोट लागेल, असं काहीही करू नका," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
 
कोरोनाचा काळ गेला तर मेळावा कधीच आम्ही चुकवला नाही. ही परंपरा कायम पुढे चालू ठेवली जाईल, असं ठाकरे म्हणालेत.
 
दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (23 सप्टेंबर) सुनावणी झाली.
 
यावेळी निकाल देताना हायकोर्टानं शिंदे गटाला दणका दिला. सदा सरवणकर यांनी शिंदे गटातर्फे दाखल केलेली हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळून लावली.
न्यायालयानं निकाल देताना म्हटलं, "उद्धव ठाकरेंना पालिकेच्या अटी मानाव्या लागतील. ठाकरेंना 2 ते 6 ऑक्टोबर शिवाजी पार्क वापरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याचिकाकर्ता जबाबदार राहतील."
 
हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलं, "कोर्टानं आम्हाला दसरा मेळावा कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. महापालिकेचे आक्षेप फेटाळले आहेत. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेकडून अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाईल. कोर्टाच्या सगळ्या अटींचं पालन आम्ही करू."
 
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं, "न्यायालयानं जो निर्णय दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. आतापर्यंत कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. आता न्यायालयानं परवानगी दिली आहे. सगळ्या नियमांचं आम्ही पालन करणार आहोत."