1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 25 डिसेंबर 2021 (22:01 IST)

पंचवटी: प्राणघातक हल्ला झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या आटोक्यात येत नाहीये.पंचवटीतील हिरावाडी येथे काल दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला.. मागील भांडणाच्या कुरापतीतून काल (दि. २३ डिसेंबर २०२१) रात्री हिरावाडीत झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा एकाचा आज  सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर आहे.
 
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बाप्पा सिताराम चौक रोड,  हिरावाडी, पंचवटी येथे व्यंकटेश शर्मा व तेजस मंडलिक(जखमी) व त्यांचे मित्र यांचा त्या ठिकाणी दूध घेण्यासाठी आलेल्या रवी जोशी व श्याम जोशी यांचेशी जुन्या भांडणाच्या किरकोळ कारणावरून सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास वाद झाला.
 
हा वाद सुरु असल्याचे समजल्याने रवी जोशी यांचे भाऊ सचिन शामकांत जोशी, श्रीकांत शंकर जोशी, कुणाल शामकांत जोशी यांनी सदर ठिकाणी येऊन बाचाबाची केली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यापैकी सचिन जोशी यांनी त्याच्यासोबत आणलेल्या टोकदार चाकूने वेंकटेश शर्मा व तेजस मंडलिक यांच्यावर वार केल्याने ते जखमी झाले होते. अपोलो हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना व्यंकटेश शर्मा याचा मृत्यू झाला आहे.
 
सदर प्रकरणी घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असणारे जखमींचे मित्र मोहन वाल्मीक कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन पाचही आरोपींना लागलीच अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज माननीय कोर्टासमोर उभे केले असता त्यांना २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 
पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज पतकी पंचवटी हे करत आहेत. घटनास्थळी पोलिस उपायुक्त परिमंडळ -1 अमोल तांबे, सहा.पोलीस आयुक्त विभाग -1 अंबादास भुसारे व पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.