शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (08:58 IST)

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा

eknath shinde
पंढरपूर :विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना व स्थानिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत नव्याने कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या कामात ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन करुन कामे करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱयांना विश्वासात घेवूनच करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. आ.अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कॉरिडॉरबाबत सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा आराखडा सर्वकष होण्यासाठी वाराणसी आणि तिरुपती या देवस्थानाला सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या पथकाने भेटी देऊन पाहणी केली आहे. त्याच धर्तीवर मंदिरात येणाऱया वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
 
छोटे व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या शंकाचे निरसन करून त्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने योग्य मोबदला देणार आहे. शिवाय त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्यासाठी कॉरिडॉरचा नियोजित प्रारूप विकास आराखडा सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती, सूचना यांचा विचार करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. 

Edited By -Ratnadeep Ranshoor