1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (15:34 IST)

शिंदे गटाचे “इतके” आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट

amol mitkari
एकीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. कालच नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.
 
शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. अधिवेशनापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्टेजवर बसले आहेत, जबाबदारीने सांगतो हे सरकार कोसळणार आहे. पुन्हा आपली सत्ता येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहिती आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळचा विस्तार होत नाही तोपर्यंतच आपले सरकार आहे. एकदा का मंत्रिमंडळ विस्तार झाला की हे सरकार शंभर टक्के कोसळणार. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीत हिवाळी अधिवेशनात होणार्‍या मुद्यांवर चर्चा झाली. महापुरुषांबाबतचा मुद्दा अधिवेशनात देखील सर्वाधिक तापण्याची शक्यता आहे. याचबरोबर शेतकर्‍यांना मिळणारी मदत, ईडी कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार यावरून देखील विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे, याच मुद्यांवर ही भेट महत्वाची ठरणार आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor