गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (07:57 IST)

परिवर्तन क्रांतीला येत्या 9 ऑगस्टला सुरूवात

sambhaji raje
स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून परिवर्तन क्रांतीला येत्या 9 ऑगस्टला सुरूवात करणार असल्याची घोषणा माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी केली. ऑगस्ट क्रांतीदिनी (9 ऑगस्ट) आई तुळजाभवानीचा आर्शिवाद घेऊन तुळजापुरातून राज्याचा दौरा सुरू करणार असल्याचेही संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्व्टिव्दारे स्पष्ट केले आहे.
 
राज्यसभा सदस्यपदावरून निवृत्त झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यभर संघटन बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अन्यायाविरोधात स्वराज्य संघटना कार्य करेल. राज्यात एक सक्षम पर्याय म्हणून स्वराज्य संघटनेची बांधणी करण्यात येणार असल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, काळात राज्यसभा निवडणुकीत शिवसेना व मित्र पक्षांकडून पुरस्कृत उमेदवारीसाठी संभाजीराजे यांनी प्रयत्न केले होते. पण शिवसेनेने पक्षात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी देण्याचे जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी पक्षीय बंधनात न अडकता निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ते शांत राहिले होते. आता त्यांनी स्वराज्य संघटनेचा विस्तार करण्यासाठी राज्यभर दौरा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 9 ऑगस्टला क्रांती दिनी परिवर्तनाच्या क्रांतीला सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बुधवारी जाहीर केले. 9 ऑगस्ट रोजी असणाऱया क्रांतीदिनादिवशी तुळजापूर येथे भेटू, असे ट्व्टि केल्यानंतर आता संभाजीराजे यांच्या आगामी वाटचालीकडे राजकीय वर्तुळासह साऱयांच्या नजरा लागल्या आहेत.