सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (14:18 IST)

'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है'... म्हणत रुग्णाची हत्या

सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयातून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयांमध्ये एका रुग्णाने दुसऱ्या वयोवृद्ध रुग्णाला सलाईनच्या लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला आहे. 
 
नेमकं काय घडलं?
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक मध्ये गेल्या काही महिन्यापासून १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले होते. याच वॉर्डात फुप्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला देखील दाखल करण्यात आले होते. काल रात्री याच युसूफ पिरजादेने सलाईन लावण्याचा लोखंडी स्टॅण्डने मारहाण ७० वर्षीय इसमाची हत्या केली आहे. मारहाण झाल्यावर वृद्धला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेघर रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
युसूफ मैलाली पिरजादे असं 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. युसूफ पिरजादे मागील 8 दिवसांपासून उपचार घेत होता तर उपचार सुरू असताना शुक्रवारी हा रुग्णालयातून पळून गेला होता. पण नातेवाईकांनी त्याला शनिवारी रात्री पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. दरम्यान, सोमवारी रात्री आठच्या सुमारास संबंधित मनोरुग्ण अचानक झोपेतून उठला आणि हातवारे करत म्हणत होता की 'ये शैतान है, मुझे तकलीफ दे रहा है'. वैद्यकीय कर्मचारी रुग्णाजवळ येईपर्यंत पिरजादेने जवळच असलेल्या सलाइन लावण्याच्या लोखंडी स्टॅण्डने बेघर वृध्‍द रुग्णावर हल्ला केला. त्याने रुग्णाच्या डोक्यात तीन घाव घातले. या भयंकर हल्ल्यात रुग्ण जागीच कोसळला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
दरम्यान रुग्णालयात एकच गोंधळ उडाला असून या धक्कादायक घटनामुळे हॉस्पिटल मधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.