रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:35 IST)

‘रंगलेल्या गालाचा मुका’ प्रकरण : फडणवीसांकडून दरेकरांची पाठराखण

भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. दरेकर यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. तसंच चाकणकर यांनी दरेकरांना इशाराही दिलाय. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या कुठले मुद्दे नसल्यामुळे दरेकरांना टार्गेट केलं जात असल्याची टीका फडणवीस यांनी केलीय.
 
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की प्रवीण दरेकर यांनी बोलीभाषेत अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठले मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी दरेकर यांची पाठराखण केलीय.
 
दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते.राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं.प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे,अशी टीका दरेकर यांनी केलीय.त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे.दरेकर यांनी माफी मागावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.
 
चाकणकरांचा हल्लाबोल
दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे.प्रविण दरेकर,महिलांची माफी मागा.नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.