सोशल डिस्टंसिंग पाळत 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी : विजय वडेट्टीवार
“कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे“,अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली. वडेट्टीवार म्हणाले, 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टंसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल/सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या.
सादर मागण्यांचा विचार करून शासनाने या बाबतीत निर्णय घेतला आहे. नागरिकांची मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे, खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच “कोविड-19“ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.