शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:34 IST)

राहुल गांधींनी खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो व्हायरल; संजय राऊत म्हणाले…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधकांच्या एकजुटीची हाक दिली आहे. दिल्लीच्या कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ‘नाश्ता बैठकी’त १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पेगॅसस, शेती कायदे, इंधन दरवाढ अशा लोकांशी संबंधित मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केलं. या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतदेखील सहभागी झाले होते. बैठकीत राहुल गांधींच्या शेजारी बसलेल्या संजय राऊत यांचा एक फोटो नंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोत राहुल गांधी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या फोटोवर भाष्य केलं आहे.
 
संजय राऊत यांना या व्हायरल फोटोसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्ष नाही तर मनंही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावलं पडत असतील तर लोक स्वागत करतील”. दरम्यान बैठकीत शेजारची जागा दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “राज्यात आणि देशाच्या राजकारणात शिवसेनेला नेहमीच मानाचं स्थान मिळालं आहे. राहुल गांधी आणि माझी सातत्याने चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे”.
 
राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार ज्याने घटनेनुसार शपथ घेतली आहे त्यांची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील किंवा एमपीएमसीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणी इतर असतं. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. “राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं. पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल,” असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.