बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जुलै 2020 (08:32 IST)

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातिचे संकट कायम, पवना धरणात केवळ 34 टक्के पाणी साठा

पिंपरी-चिंचवड शहराची तहाण भागवणा-या पवना धरण परिक्षेत्रात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा खूपच कमी आहे. मागच्यावर्षी याच महिन्यात 1169 मीलीमीटर पाऊस झाला होता. यंदा केवळ 491 मीलीमीटर पावसाची नोंद आहे. गतवर्षी चालू महिन्यात धरणामध्ये 47.68 टक्के पाणीसाठा होता. तर, सध्या धरणात केवळ 34.62 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह धरणक्षेत्रातील नगरांची तहाण भागवण्यासाठी पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची गरज आहे.
 
पावसाचा अंदाज घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराला दिवसाआड पाणी पुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजअखेर पवना धरण क्षेत्रात केवळ 491 मीलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणात केवळ 34.62 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. पुढील दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठी उपलब्ध आहे. 5 ऑगस्टपर्यंत पडणा-या पावसाचा अंदाज घेऊन पुढील पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पवना धरण प्रशासनाने वर्तविले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना सध्या पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
 
लॉकडाऊन दरम्यान तीन महिने पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात पाण्याचा पुरवठा कमी झाला. परंतु, नोकरी, कामधंदे बंद असल्यामुळे घरातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. लॉकडाऊनपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराला 900 ते 925 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जायचा. लॉकडाऊनदरम्यान जून, जुलै महिन्यात 800 दशलक्ष लीटर प्रतिदीन पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु, सध्या दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाच ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर आणखीन कपातीचे संकट कायम आहे.
सध्याचा पाणीसाठा
 
34.62 टक्के
2.25 टीएमसी
आतापर्यंतचा पाऊस 491 मीलीमीटर
गतवर्षीचा पाणीसाठा
४७.६४ टक्के
४.०५ टीएमसी
११६९ मिलीमीटर पाऊस