गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:37 IST)

दोन दिवस पंतप्रधान पुण्यात मुक्कामी

देशातील पोलिस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री पुण्यात आगमन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दोन दिवस पंतप्रधान पुण्यात मुक्कामी आहेत.देशभरातील पोलिस महासंचालकाची परिषद दि. 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत पुण्यात होत आहे. या परिषदेला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सर्व राज्यातील पोलिस महासंचालक; तसेच गुप्तचर विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित  आहेत. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. तर शनिवारी पंतप्रधान मोदी हे पोलिस महासंचालकांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर रविवारी ते पुण्याहून  दिल्लीला रवाना होणार आहेत.
 
दरम्यान, या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांचे  शुक्रवारी साडेनऊच्या सुमारास पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासह माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, शहर सरचिटणीस गणेश बीडकर, तसेच शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.