शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:28 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; असा आहे त्यांचा भरगच्च दौरा

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.
 
पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे.
 
पंतप्रधान मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.
 
सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.
 
पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै,1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832 साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.