बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (20:42 IST)

पोलिसांचं पुन्हा मिशन सोलापूर; ड्रग्ज कारखान्यानंतर आता गोदामावर धाड!

सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत धाड टाकून मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1 व एन. डी. पी. एस. च्या विशेष टास्क फोर्सने सोलापूरमध्ये काल (दि. 3) दुसऱ्यांदा धाड टाकून तेथील अमली पदार्थांचे गुदाम उद्ध्वस्त केले आहे.
 
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की सामनगाव एम. डी. प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला हा कारखाना नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने आठ दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला होता. या प्रकरणात नाशिकच्या मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी दि. 28 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

त्याने दिलेल्या माहितीवरून सनीच्या सांगण्यावरून दरमहा नफ्यासाठी कारखान्याचा कायदेशीर करार केला होता, अशी माहिती मिळाली. त्याआधारे गुरुवारी वैजनाथ आवळे याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता आवळेने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल एका गुदामात असल्याची माहिती मिळाली.
 
त्यानुसार विशेष टास्क फोर्सचे पथक सोलापूर तालुक्यातील कोडी या गावातील गुदामाजवळ दाखल झाले. पोलिसांनी तेथून एमडी बनविण्याकरिता लागणारे मुख्य रासायनिक द्रव्याचे प्रत्येकी 5 ड्रम (अंदाजे 22 लाख रुपये किमतीचे), 175 किलो क्रूड पावडर, एक ड्रायर मशीन, दोन मोठे स्पीकर बॉक्स आणि इतर साहित्य असा एकूण 40 लाख रुपये किमतीचे एमडी बनविण्याकरिता लागणार कच्चा माल आढळून आला.
 
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टास्क फोर्सचे प्रमुख विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने केली.
 
अशी करीत होते कच्च्या मालाची तस्करी:एम. डी. बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल व एम. डी. राज्यात विविध ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वैजनाथ आवळे हा स्पीकर बॉक्समधून त्याची वाहतूक करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने ही शक्कल लढविल्याने त्याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते. त्यामुळे त्याचा हा कारभार बिनबोभाटपणे सुरू होता. अखेर त्याच्या या व्यवसायाचे बिंग फोडण्यात नाशिक शहर पोलिसांच्या टास्क फोर्सच्या कामगिरीला यश आले आहे. सनी पगारे पण याच पद्धतीने एम. डी. ची वाहतूक करीत असल्याचे याआधीच समोर आले होते.


Edited By - Ratnadeep Ranshoor