राजापूरात चार वर्षाच्या बालकामध्ये पोलिओ सदृश्य लक्षणे; आरोग्य विभाग सतर्क
राजापूर :राजापूर शहरात तालीमखाना परिसरातील एका चार वर्षाच्या बालकामध्ये पोलिओ सदृश्य (जी.बी. सिंड्रोमची) लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. या बालकावर सध्या कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीओ सदृश्य (जी.बी. सिंड्रोमची) लक्षणे आढळून आल्याने या बालकाच्या घरापासून शहर व पसिरातील पाच किलोमिटर अंतरावरिल शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ डोस पाजला जाणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांनी दिली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचेही डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.
राजापूर शहरातील तालीम खाना भागातील हा चार वर्षे चार महिने वयाचा बालक असून तो शहर बाजारपेठेतील एक अंगणवाडीमध्ये शिकत आहे. ८ ऑगस्टपासून त्याला ताप आला होता, त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला शहरातील खासगी डॉक्टरांकडे तपासले. प्रारंभी व्हायरल ताप असेल असे वाटत असतानाच या बालकाचे हात व पाय दुखण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याला रत्नागिरीतील खासगी रूग्णायात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला कोल्हापूर अथवा मुंबईत हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांनी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले आहे. १७ ऑगस्ट रोजी त्याला सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.
या पोलीओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोम ) आजारात अंग दुखू लागणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे व हातपाय लुळे पडणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. तशा प्रकारची काही लक्षणे या बालकामध्ये आढळून आली आहेत.