राज्यात 10 मार्चला पोलीओ लसीकरण अभियान
राज्यात 10 मार्चरोजी पल्स पोलीओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलीओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर 82 हजार 719 पोलीओ बुथ उभारण्यात येणार आहे. 0 ते 5 वयोगटातील सर्व मुला-मुलींना पोलीओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावर्षी 1 कोटी 21 लाख 60 हजार 63 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे 82 हजार 719 पोलीओ बुथ उभारण्यात येणार असून त्यासाठी 2 लाख 19 हजार 313 एवढा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. 16 हजार 548 पर्यवेक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत 2 कोटी 92 लाख 19 हजार 543 घरांना भेटी देऊन पोलीओ डोस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 13 हजार 927 मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहतील. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.