प्रकाश आंबेडकर काय ओवेसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात
प्रकाश आंबेडकरच काय ओवेसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात. पण त्यांनी तसं जरी केलं आणि आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजपा युतीच जिंकेल, असा सणसणीत टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी नवी दिल्लीत गेले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर बावनकुळे यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. "उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती केली तरीही आम्ही निवडणूक जिंकण्यास सज्ज आहोत. महाविकास आघाडीच्या रुपाने आमचे विरोधक यापूर्वीच एकत्र आहेत. तरीही आम्ही राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही. शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत आहेत. आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याची तयारी करत आहोत. त्यामुळे विरोधकांच्या युतीमुळे आम्हाला फरक पडणार नाही," असे बावनकुळे म्हणाले.
Edited By- Ratnadeep Ranshoor