शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:03 IST)

येत्‍या ११ ऑक्‍टोबरला राज्‍यसेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्‍या ११ ऑक्‍टोबरला राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्‍या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे (हॉल तिकीट) आयोगाच्‍या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले असून, उमेदवारांना प्रोफाईलद्वारे प्राप्त करून घेता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्‍या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्‍तीचे असून, त्‍याशिवाय प्रवेश दिला जाणार असल्‍याचे आयोगाने स्‍पष्ट केले आहे. यासह अन्‍य विविध सूचनादेखील जारी केल्‍या आहेत.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यापूर्वी दोन वेळा राज्‍यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली होती. सप्‍टेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात जारी सूचनेनुसार ही परीक्षा येत्‍या ११ ऑक्‍टोबरला होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जारी केलेल्‍या सूचनांनुसार उमेदवारांनी ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्‍वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, व स्‍मार्टकार्ड प्रमाणे ड्रायव्‍हिंग लायसन्‍स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणायचे आहे. सोबत उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्‍पष्टपणे दिसेल अशी मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य असेल. मूळ ओळखपत्राच्‍या पुराव्‍याऐवजी केवळ त्‍याच्‍या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्‍सशिवाय कोणताही अन्‍य पुरावा ग्राह धरला जाणार नाही. ई-आधार वैध धरले जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.
 
परीक्षेच्‍या दिवशी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्‍या, अतिवृष्टी आदी बाबी लक्षात घेत परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहाणे आवश्‍यक असेल. परीक्षा सुरू होण्याच्‍या एक तास आधी बैठक क्रमांकावर उपस्‍थित राहाणे अनिवार्य असेल. प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत, मास्‍क, फेस शिल्‍ड, हातमोजे, सॅनिटायझरची पारदर्शक बाटली, पाण्याची पारदर्शक बाटली आदी साहित्‍य परीक्षा केंद्रात नेण्यास परवानगी आहे.