रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (08:11 IST)

रेमडेसिवीरची तब्बल २ लाख १५ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार

राज्यात या आठवड्यात रेमडेसिवीरची तब्बल २ लाख १५ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनासुद्धा सहज इंजेक्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिणगे यांनी रेमडेसिवीरच्या होत असलेल्या काळाबाजार प्रकरणी मुंबईतील औषध उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यासोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत औषध उत्पादकांनी आठवडाभरात महाराष्ट्रातला तब्बल २ लाख १५ हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. 
 
सध्या भारतामध्ये मे. हेट्रो हेल्थकेअर या कंपनीमार्फत रेमडेसिवीरचे उत्पादन हैदराबाद येथे करण्यात येत असून, लवकरच गुजरातमधील नवसारी येथील फॅक्टरीमध्ये त्याच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे सिप्लाकडून गुजरातमधील बडोदा येथे उत्पादन सुरू असून, लवकरच गोव्यामधील कारखान्यात याचे उत्पादन सुरू होणार आहे. तसेच मे. मायलॉन लिमिटेड या कंपनीला सुद्धा औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली आहे. त्यांचे उत्पादनही बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या औषधांचा पुरवठा वाढून काळाबाजाराला आळा घालण्यास मदत होईल, असा विश्वास उत्पादक कंपन्यांकडून वर्तवण्यात आला.
 
टोसीलीझुमॅब या औषधाचा जागतिक स्तरावर तुटवडा आहे. तरीही औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करून राज्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यासाठी वितरक कंपन्यांनी प्रयत्न करावे. तसेच रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचे वितरण काही ठरावीक वितरकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी या औषधांची विक्री अधिक वितरकांकडून करण्याच्या तसेच ही औषधे महाराष्ट्रात समप्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिणगे यांनी औषध उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत.
रेमडेसिवीर हे औषध अत्यावश्यक असेल तर रुग्णांना लिहून द्यावे, असे आवाहन डॉक्टर व रुग्णालयांना डॉ. राजेंद्र शिणगे यांनी केले. त्याचप्रमाणे औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.