सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (16:05 IST)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील.
 
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सुमारे साडेसात कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याच्या योजनेलाही मंत्रीमंडळाकडून आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रति कुटुंब १ किलो हरभरे दिले जाणार आहेत. देशातल्या ८० कोटी नागरिकांना याचा लाभ होईल.
 
परवडणाऱ्या दरात भाड्याची घरं उपलब्ध करुन देण्याच्या योजनेलाही आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत शहरी भागात राहणारे गरीब आणि स्थलांतरितांना कमी दरात घरं भाड्यानं दिली जातील. या अंतर्गत १ लाख ८ हजार वन बीएचकेची घरं भाड्यानं दिली जाणार आहेत. विविध राज्यांनी उभारलेली मात्र रिकामी असलेली घरंही या योजनेत वापरली जाणार आहेत.
 
छोट्या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ता भरण्याची योजना ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. ७२ लाख कामगारांना याचा लाभ मिळेल.
 
सार्वजनिक क्षेत्रातल्या साधारण वीमा कंपन्यांना भांडवल देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इन्शुरन्स या कंपन्यांना सरकार १२ हजार ४५० कोटी रुपयांचं भांडवल देणार आहे.