रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (07:50 IST)

coronavirus: हैदराबादहून रेमडेसिवीरची साडेतीन हजार इंजेक्शन मुंबईत; आजपासून उपलब्ध होणार

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमेडेसीवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. मुंबई महापालिकेने तुटवडा होण्यापूर्वीच हैदराबादमधील एका औषध उत्पादक कंपनीला १५ हजार इंजेक्शनची आॅर्डर दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३ हजार ५०० हून अधिक इंजेक्शन हैदराबादवरून रविवारी रात्री विमानाने मुंबईत पोहोचणार आहेत.

उद्यापासून या इंजेक्शनचे वाटप मागणीनुसार रुग्णालयात करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. कोरोना रुग्णांवर रेमेडेसीवीर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशात या इंजेक्शनचा वापर वाढला आहे. त्यामुळे मागणी ही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील काही कंपन्याना या इंजेक्शनच्या उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. यात हैदराबादमधील हेट्रो हेल्थ केअर कंपनीचाही समावेश आहे. त्यानुसार पालिकेने या कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
सध्या या इंजेक्शनचा तुटवडा नाही. या एका इंजेक्शनची किंमत ५,४०० रुपये आहे. पण १५ हजार इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ते ४,१४४ रुपयांना उपलब्ध झाल्याचे काकाणी यांनी सांगितले.

मुबलक साठा असल्याचा एफडीएचा दावा

कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडेसीवीर या औषधांचा तुडवडा असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, काही डॉक्टर-रुग्णालयाकडूनही खासगीत औषध मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए)
मात्र मुंबईसह राज्यात कुठेही या औषधाचा तुडवडा नसल्याचा दावा केला आहे. तर, रेमेडेसीवीरचा मुबलकसाठा उपलब्ध असल्याचे म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांनी काही अडचण आल्यास संपर्क करावा असे आवाहनही एफडीएचे सहआयुक्त (औषध), मुख्यालय जुगल किशोर मंत्री यांनी केले आहे.