तीन गाड्यांचा तिहेरी अपघात, त्यातील एका कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील महिला जळून राख
बीड येथील गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ स्कार्पिओ, कार आणि दुचाकी यामध्ये तिहेरी असा भीषण अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त कारने लगेच पेट घेतल्याने, आगीत एक महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. घटना कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर जाधव आपल्या घरातील सर्वांसोबत कार क्रमांक एम. एच. १४ एम. एच. ८६३९ इंडिगोने पुण्याकडे निघाले होते. त्यांची गाडी गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे आली असता, या गाडीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने जबर धडक दिली. याचवेळी अपघातग्रस्त दोन्ही गाडीला एका दुचाकीस्वार देखील येऊन धडकला होता. मात्र वाढलेले तपमान आणि झालेला जबर अपघात यामुळे जाधव यांच्या कारने लगेच पेट घेतला.
यावेळी जवळ नागरिकांनी लगेच ज्ञानेश्वर जाधव, त्यांची मुलगी यांना बाहेर काढले. मात्र काही वेळात आगीने उग्र रूप धारण केल्याने गाडीत अडकून पडलेल्या मनिषा ज्ञानेश्वर जाधव (वय ३५) या होरपळून जळून गेल्या तर त्यांच्या सोबत असलेली मुलगी लावण्या वय ८ ही जबर भाजली आहे. तसेच ज्ञानेश्वर जाधव हेही भाजले आहेत. दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.