रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (14:23 IST)

‘गर्भात वाढणारं बाळ माझं नाही... काढून टाक’असे म्हणत गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ

सोलापूर- गर्भात वाढणारे मूल हे माझे नसून मला हे मुल नकोय तू हे काढून टाक, असे म्हणत पतीने पत्नीचा गळा दाबत तिच्या पोटावर जोरात लाथ मारली तर दिराने तिचा विनयभंग केला आहे. 
 
पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पीडित महिलेचं 2020 मध्ये मुंबई मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आरोपीसोबत कुर्डुवाडी येथे थाटात लग्न झालं. लग्नानंतर आरोपी पत्नीला मुंबई घेऊन गेला. काही दिवस आनंदात गेले पण नंतर महिलेच्या सासू, सासरे, दीर, यांनी लहान-सहान कारणांवरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उपाशी ठेवू लागले. दरम्यान दिराने वाईट हेतूने महिला पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे. 
 
गर्भवती असताना हे मूल माझे नाही, तुझे कोणाबरोबर तरी लफडं असल्याचं म्हणत पतीने तिच्यावर संशय घेत, पीडितेचा गळा दाबून आणि पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात देखील झाला. त्यानंतर पतीने पत्नीला सोलापूर येथे माहेरी आणून सोडले आणि पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी पीडित महिलेनं विजापूर नाका पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत.