शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (08:04 IST)

वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावा – ‘मित्रा’च्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

ajit pawar
प्रधानमंत्र्यांचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे काम करा
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्यासाठी ‘मित्रा’ ची भूमिका महत्त्वाची
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मित्रा’ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ‘मित्रा’च्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्र्यांनी कृषी, उद्योग, अर्थ, व्यापार, उत्पादन, ‘आयटी’ क्षेत्राच्या विकासावर भर देण्याच्या तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘मित्रा’चे कामकाज प्रभावी, गतिमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. अंतिम टप्प्यात असलेले राज्यातील 89 सिंचन प्रकल्प, जिल्हाविकासाच्या योजना, नागरी पाणीपुरवठ्याचे, मलनिस्सारण प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. राज्याचे ग्रोथ सेंटर असलेल्या पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या रिंगरोडसह उन्नत रस्त्याचे काम ‘एनएचएआय’ आणि ‘मित्रा’च्या समन्वय, सहकार्याने मार्गी लावण्यात यावे, आदी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. बैठकीला ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, अपर मुख्य सचिव दिपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
Edited By - Ratnadeep ranshoor