मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (09:40 IST)

कच्छतीवू : नरेंद्र मोदींनी ज्या बेटाचा उल्लेख केला, त्याचा इतिहास-भूगोल जाणून घ्या

Kachthivu
social media
विरोधकांच्या आघाडीने अर्थात 'इंडिया'ने केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कच्छतीवूचा उल्लेख करून काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.
 
राहुल गांधींनी बुधवारी (9 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत 'भारतमाता' आणि मणिपूरमधील हिंदुस्थानच्या हत्येबाबत भाष्य केलं होतं.
 
काल (11 ऑगस्ट) संसदेत राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेसचा तर भारतमातेचे तुकडे करण्याचा इतिहास आहे."
 
श्रीलंका : दिवाळखोरीला 1 वर्ष झाल्यानंतर आता परिस्थिती कशी आहे?
19 जुलै 2023
श्रीलंका : ‘भुकेली मुलं शाळेत सकाळच्या प्रार्थनेवेळीच बेशुद्ध पडतात’
6 जानेवारी 2023
फणसामुळे 'या' देशात वाचताहेत अनेक लोकांचे प्राण
9 जुलै 2023
विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केल्यानंतर ते म्हणाले, "हे जे बाहेर गेले ना... कोणीतरी (विरोधक) विचारा यांना कच्छतीवूचं काय झालं? खूप मोठं मोठं बोलतात ना... विचारा त्यांना कच्छतीवू कुठं आहे. ते गोष्टी लिहून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात."
 
मोदी पुढे म्हणाले, "द्रमुकचे लोक, त्यांचं सरकार, त्यांचे मुख्यमंत्री मला पत्र लिहितात की, मोदीजी कच्छतीवू परत आणा. हे कच्छतीवू कुठं आहे? तमिळनाडूपासून पुढे. ती भारतमाता नव्हती का? ते भारतमातेचं अंग नव्हतं का? हे देखील तुम्हीच तोडलं. कोण होतं त्यावेळी? श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली हे घडलं. काँग्रेसने भारतमातेचे तुकडे तुकडे केले आहेत आणि हाच त्यांचा इतिहास आहे. "
 
कच्छतीवू बेटाचा इतिहास आणि भूगोल
कच्छतीवू हे भारतातील रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मुख्य भूभागामधील एक लहान बेट आहे. हे बेट परत घेण्याची मागणी सातत्याने होत आहे. काही लोक असंही म्हणतात की भारताने हे बेट भेट स्वरूपात देऊन टाकलं होतं. कच्छतीवू बेटाचं संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
 
श्रीलंकेचा उत्तर किनारा आणि भारताच्या आग्नेय किनार्‍यादरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे. 1755 ते 1763 पर्यंत मद्रास प्रांताचे गव्हर्नर असलेले रॉबर्ट पाल्क यांच्या नावावरून या सामुद्रधुनीला नाव देण्यात आलंय.
 
पाल्क सामुद्रधुनीला समुद्र म्हणता येणार नाही. प्रवाळ खडक आणि वालुकामय खडकांमुळे या भागातून मोठी जहाजे जाऊ शकत नाहीत.
 
या पाल्कच्या सामुद्रधुनीत कच्छतीवू बेट आहे. हे भारतातील रामेश्वरमपासून 12 मैल आणि जाफनामधील नेदुंडीपासून 10.5 मैलांवर आहे. त्यांचं क्षेत्रफळ सुमारे 285 एकर इतकं आहे. त्याची रुंदी 300 मीटर इतकी आहे.
 
या निर्जन बेटावर सेंट अँटोनी चर्चही आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इथे आठवडाभर पूजा केली जाते. 1983 मध्ये श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान ही पूजा थांबवण्यात आली.
 
'द गॅझेटियर' नुसार, 20 व्या शतकाच्या सुरुवातीस रामनाथपुरमच्या सीनिकुप्पन पदयाची यांनी इथे एक मंदिर बांधलं होतं. थंगाची मठातील पुजारी या मंदिरात पूजा करायचे. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी या बेटावर ताबा मिळवला होता.
 
कच्छतीवू बेटावर कोणाचं नियंत्रण आहे?
कच्छतीवू बेट बंगालच्या उपसागराला अरबी समुद्राशी जोडतं.
 
यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात वाद सुरू आहे. 1976 पर्यंत भारताने या बेटावर आपला दावा ठोकला होता. पण त्यावेळी हे बेट श्रीलंकेकडे होतं.
 
1974 ते 1976 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती श्रीमाव भंडारनायके यांच्यासोबत चार सागरी सीमा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
 
या करारामुळे कच्छतीवू श्रीलंकेकडे गेलं.
 
पण तामिळनाडू सरकारने हा करार स्वीकारण्यास नकार दिला आणि कच्छतीवू श्रीलंकेकडून परत घेण्याची मागणी केली.
 
कच्छतीवूवरून केंद्र आणि तामिळनाडूमध्ये वाद
1991 मध्ये तामिळनाडू विधानसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला. याद्वारे कच्छतीवूचा भारतात समावेश करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली.
 
कच्छतीवूबाबतचा तामिळनाडू आणि केंद्र सरकारमधील वाद केवळ विधानसभेच्या ठरावापुरता मर्यादित नव्हता.
 
2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी कच्छतीवू प्रकरणात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचलं होतं.
 
त्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे कच्छतीवूचा करार रद्द करण्याची मागणी केली.
 
जयललिता यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे श्रीलंका आणि भारत यांच्यातील दोन करारांना असंवैधानिक घोषित करावं अशी मागणी केली. याच करारांतर्गत कच्छतीवू श्रीलंकेला भेट देण्यात आलं होतं.