शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:21 IST)

खासगी सावकार महिलेच्या घरावर छापा; 38 कर्जदारांचे कोरे धनादेश हस्तगत

jail
नाशिक :- खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत एका खासगी सावकार महिलेच्या घरावर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून 38 व्यक्तींचे चेक व विविध कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
 
याबाबत नाशिक तालुका उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रदीप गोविंदराव महाजन (रा. दर्पण संकुल, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की महाजन यांच्या कार्यालयास बेकायदेशीर खासगी सावकार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठीचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने संशयित खासगी सावकार मोहिनी प्रकाश पवार व राजू शंकर पवार (दोघेही रा. भक्तीसागर अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांच्या घरावर मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास सावकारी अधिनियम 2014 च्या 16 अन्वये शासकीय अधिकारांचा वापर करून पंचांसमक्ष छापा टाकला.
 
यावेळी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकाचे अधिकारी प्रदीप महाजन यांना मोहिनी पवार व राजू पवार या खासगी सावकारांकडे एकूण 38 व्यक्तींचे धनादेश व विविध प्रकारची कागदपत्रे मिळून आली, तसेच एकूण 26 व्यक्तींना दिलेल्या रकमेपोटी हातउसनवार पावती व काही कोरे चेक मिळून आले.
 
दरम्यान, पथकाने मोहिनी पवार व राजू पवार या खासगी सावकारांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम अध्यादेश 2014 अन्वये गुन्हा केलेला आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात सावकारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor