रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:30 IST)

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी

kolhapur
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच मिरवणुका आणि सभांना देखील बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी गुरुवारी (दि. 8) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कोल्हापूर कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 10) कोल्हापुर येथील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यामधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेचे संजय पवार, जयश्री जाधव यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.
 
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे प्रकल्प, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारविरोधात मुंबईत 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor