1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (08:14 IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश जारी

Prohibition order issued in Sindhudurg district till September 7 Maharashtra News Regional news In Marathi Webdunia Marathi
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली.या अटकेच्या पार्श्वभूमीवर,सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच एसआरपीएफची अतिरिक्त कुमकही दाखल झाली आहे जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली गेली आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राणेंच्या अटकेसाठी आंदोलने सुरू केली.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचे पडसात उमटले व शिवसेनेने आंदोलने सुरू केली. त्यानंतर राणेंना संगमेश्वर येथे रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भाजपाने आंदोलने सुरू केली. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजपा कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध संघर्ष करून वाद निर्माण होऊ नये,कायदा व सुव्यवस्था बिघडू नये,अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
 
राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस कुमकही जादा पोलीस बंदोबस्तासाठी मागवून तैनात करण्यात येत आहेत, तर मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१)(३) प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले असून पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन जमाव करता येणार नाही. सभा, मिरवणुका काढता येणार नाहीत,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला जिल्ह्याची परिस्थिती पाहूनच परवानगी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.