बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (19:17 IST)

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर का येत आहेत?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडाला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते आपला चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा सुरू करतील.
खासदार संभाजी राजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होत. तब्बल 35 वर्षांनंतर राष्ट्रपती रायगडावर भेटीसाठी येत आहेत.
राष्ट्रपती कोविंद यांच्यासाठी गडावर हेलिपॅड बांधण्यात आलं होतं. पण शिवप्रेमींचा विरोध पहाता रोप-वे ने राष्ट्रपती गडावर जाणार आहेत.
 
राष्ट्रपतींचा रायगडावर कार्यक्रम काय?
राष्ट्रपती कोविंद 6 ते 9 डिसेंबर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं रायगडावर आगमन होणार आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत म्हणाले, "रायगड किल्ल्याचं संवर्धन-जतन होतंय. हा किल्ला रोड मॅाडेल होऊ शकतो याची माहिती मी राष्ट्रपतींना दिली होती. ते स्वतः शिवभक्त असल्याने मी त्यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं."
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावात उतरणार आहेत. त्यानंतर रोप-वे ने रायगडावर जाणार आहेत.
"महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर किल्ल्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे. असं झालं तर शिवाजी महाराजांचे हे सर्व किल्ले जिवंत स्मारक होतील, " असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं.
राष्ट्रपती रायगड दौऱ्यात राज सदरला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहेत.
1980 साली इंदिरा गांधी यांनीदेखील रायगडाला भेट दिली होती. त्यानंतर 1985 साली तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आले होते.
आता तब्बल 35 वर्षांनंतर भारताचे राष्ट्रपती रायगड दौऱ्यावर येत आहेत.
 
रोप-वे ने का जाणार रायगडावर?
रायगडावर जाण्यासाठी राष्ट्रपती हेलिकॅाप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. पण शिवप्रेमींनी विरोध केल्यामुळे राष्ट्रपती रोप-वे ने रायगडावर जाणार आहेत.
खासदार संभाजीराजे यांनी याबाबत माहिती दिलीये. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रायगडावर येत आहेत. शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत."
हेलिकॅाप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडायची. त्यामुळे शिवप्रेमींनी 1966 साली आंदोलन केलं होतं.
त्यानंतर रायगडावरील हेलिपॅड काढून टाकण्यात आलं होतं.
 
सुरक्षेचा चोख बंदोबस्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यामुळे रायगडावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
रायगड पर्यटक आणि इतरांसाठी 3 ते 7 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आलाय. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरातही पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.