शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (12:24 IST)

महाराष्ट्रासह काही राज्यांत पावसाची शक्यता वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम

rain
देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. महाराष्ट्रातील स्थिती पाहता हवामान चक्राच्या बदलामुळे मागील काही आठवड्यात ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव, तर आता पहाटे थंडी, दुपारी कडाक्याच्या उन्हाचा अनुभव घ्यावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की ११ ते १४ मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. १२ ते १४ मार्च या कालावधीत आजूबाजूच्या मैदानी भागात तुरळक पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील २ दिवसांत उष्णता वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
महाराष्ट्रात सध्या काही भागात उन्हाळा सुरू झाला असून वाढत्या उकाड्याने नागरिकांना आतापासूनच हैराण केले आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशत: ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा देखील वाहू लागल्या आहेत. विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तर दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार १२ ते १४ मार्च दरम्यान पंजाबमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १३ आणि १४ मार्च रोजी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. याशिवाय ईशान्य भारतातील आएमडीने १३ आणि १४ मार्च रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या पावसाचा इशारा जारी केला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम
हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी आणि पावसामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह ३६० हून अधिक रस्ते बंद आहेत. १० मार्चपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार १० मार्चच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार १० मार्च रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ११ ते १४ मार्च दरम्यान या प्रदेशात तुरळक गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडसाठी, हवामान खात्याने ११ ते १४ मार्च दरम्यान तुरळक हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor