राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला भेट देणार, मनसेने लावले 'चला अयोध्या'चे बॅनर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईत राज ठाकरेंच्या छायाचित्रासह 'चला अयोध्या'चे बॅनर लावले आहेत. 5 जून रोजी राज ठाकरेंसोबत अयोध्येला पोहोचण्याचे आवाहन मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बॅनरवर हिंदीत 'जय श्री राम' लिहिलेले आहे. त्यात मी धर्मांध नाही, मी धर्माभिमानी आहे, चला अयोध्या ! असे लिहिले आहे.
मशिदींवरील लाऊडस्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक प्रश्न आहे, असे मनसे प्रमुख रविवारी म्हणाले होते. हे लाऊडस्पीकर काढण्यासाठी त्यांनी3 मेपर्यंतची मुदत दिली आहे. हे लाऊडस्पीकर न हटवल्यास 4 मेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
औरंगाबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्राचा पहिला दिवस आहे. आजपासून चार दिवसांनी मी कोणाचेही ऐकणार नाही. जिथे लाऊडस्पीकर दिसेल तिथे मी हनुमान चालीसा लावणार. हा धर्माशी निगडित नसून समाजाचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.