मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (22:06 IST)

राज ठाकरे शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही?, भुजबळ यांचा सवाल

chagan bhujbal
राज ठाकरेंनी लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी सभा घेतली होती, पवार साहेबांना जातीयवादी ठरविण्यासाठी सभा होती, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे, माझं राज याना सवाल ते शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार  नाशिक  दौऱ्यावर होते. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे  जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभा शरद पवार  यांना जातीयवादी ठरविण्यासाठी घेत आहेत.
 
ते पुढे म्हणाले कि, राज ठाकरे यांनी मांडलेला इतिहास धादांत खोटा आहे, राज यांनी इतिहास तपासून बघावा, 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले, त्यावेळी संभाजी महाराज यांनी समाधी बांधली, त्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात होता, त्यानंतर पेशव्यांनी जिंकला.1773 ते 1818 समाधी चा उल्लेख कुठेही नाही, पेशव्यांनी सुद्धा समाधि कडे दुर्लक्ष केले असे इतिहास सांगतो. त्यानंतरच्या काळात 1869 मध्ये महात्मा फुले यांनी समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते.
 
टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी, यासाठी फंड काढला, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. उभ्या हयातीत टिळक यांनी एक खडा सुद्धा बसवायला नाही. पुढे 1926 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहुन निधींचे काय झाले विचारले, ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली. त्यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराज यांचे चौथरा आणि छत्र बांधले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.