बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (14:40 IST)

गांधी जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरेंनी केलेलं 'हे' ट्वीट व्हायरल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज जगभरातून अभिवादन केलं जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. प्रांजळपण आणि तटस्थपण हे गांधीजींच्या ठायी असलेले दोन गुण अंगिकारल्यास आपल्या अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील,' असा विश्वास राज यांनी व्यक्त केला आहे.
 
गांधी जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी आज एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नायक आणि काही प्रतिकांमध्येच अडकवण्यात आल्याची खंत त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे कमालीचा प्रांजळपणा व तटस्थपणा होता. एखादी चूक किंवा अपराध, मग तो परकियांकडून घडलेला असो की स्वकियांकडून. त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत. मात्र, नेमकं हेच आज विसरलं जातंय,' असं राज यांनी म्हटलं आहे.
 
'गांधीजींमध्ये (mahatma gandhi) अहंभाव नव्हता. माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा. कारण, ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे हे सांगण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय (politics) परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरू झालं आहे,' असं राज यांनी म्हटलं आहे.
 
'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला हे गांधीजींचं तत्व अंगिकारलं जात असेल तर ठीक. पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट आहे. करोनाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरू आहे. त्यात गांधीजींचं प्रांजळपण व तटस्थपण अंगिकारलं तरी अनेक प्रश्नावर उत्तरं सापडतील,' असं म्हणत राज यांनी गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं आहे.